Sunday, July 25, 2010

बसल्या बसल्या-१

-------------------------------------------------------------------------------------------------------
बसल्या बसल्या आपल्याला काही कधी काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला/पाहायला मिळते. मग असलं काही बाकीच्यांबरोबर शेअर करावं असं वाटते. मला पण असंच काहीतरी या पोस्त मध्ये शेअर करायचं आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
"एक क्रांतिकारी संभाषण" 
वेळ: सकाळी ९ वाजता
स्थळ : गेस्ट हौस, बद्दी, हिमाचल प्रदेश.
पात्रे: मी, बलदेव (आमचा ड्रायव्हर), इंदर (आमचा नेपाळी आचारी)

मी चहा-बिस्कीट खात बसलो होतो. (मी पराठे खायचे बंद केले आहेत. वैतागून.) समोर "अमर उजाला" होता.
बलदेव आला. गडबडीत होता. उगाचच. हा साला लेट झाला कि गडबडीत असल्यासारखा दाखवतो.

बलदेव: "सर, कतरिना का व्हीडीओ आया है. देखा क्या आपने?"
'बेटा मन में लड्डू फुटा' अशी अवस्था होउन सुधा, मी मान हलवत नाही म्हटले. कारण एका हातात चहाचा कप अणि दुसर्या हातात बिस्किट होते.
"तुने कहा देखा?" इन्दर ने एंट्री मारली.
बलदेव: "पंजाब केसरी में आया है"
इन्दर: "पंजाब केसरी में व्हीडीओ?"

बलदेव: "अरे मतलब पंजाब केसरी में खबर छपी है. सर, अमर उजाला में आया है क्या?"
मी परत मुंडी हलवली.
बलदेव: "कोई बात नाही सर, आज शाम को ही निकलता हूँ इन्टरनेट से."
कोई बात नाही काय? मी कुठे मागितला बाबा तो व्हिडिओ? हे मनातल्या मनात. २ सेकंदानंतर मला प्रश्न पडला.आयला याला इन्टरनेट माहिती आहे?
बलदेव: "सर ये देखो इसमे से निकाल सकते है." त्याने micromax चा ezeepad मोबाईल खिशातून बाहेर काढला.
मी: "ये कब लिया और इसमे इंटरनेट है?" त्याचा मोबाईल एकदम blackberry सारखा दिसत होता.
बलदेव:"सर कल लेके आया हून. चंडीगड सेक्टर १७ से. साडे चार हजार में. मेरा भाई जानता है कैसे व्हीडीओ निकालना है. कल सुबह आपको मिल जायेगा"
च्यायला परत तेच. मागितला नाही तरीही आपको मिल जायेगा. पण मी ही काही बोललो नाही. मिळाला तर कशाला सोडता.
इंदर: "मुझे भी दे देना". ऑल मेन आर डॉग्ज.

असो. मी चहा बिस्कीट हादडले आणि बलदेवला निघायची खूण केली. अपार्टमेंटच्या पायऱ्या उतरताना एकच गोष्ट मनात रेंगाळत होती. कम्युनिकेशन क्रांती म्हणतात ती हीच का?

Wednesday, July 21, 2010

राजकारण-१

या पोस्टला राजकारण-१ हे नाव दिले आहे. कारण असं कि आमच्या गावातल्या राजकारणावर एखादं १०० पानांचं पुस्तक आरामात लिहिता येईल. काळजी करायचं कारण नाही, मी लिहिणार नाही. १-२ पोस्ट मध्ये काम तमाम. चला सुरुवात करतो.

आमच्या गावात आम्ही राजकारण खातो, पितो, उठतो, बसतो आणि अजून जे काही करता येणं शक्य आहे, ते सगळं करतो. अतीच झालं असं वाटल तुम्हाला पण ते अती नाहीय. राजकारणानं गावाची वाट लावलीय आणि गावाने सुद्धा राजकारणाची तितकीच वाट लावली आहे. दर ६ महिन्याला निवडणुका झाल्याच पाहिजेत असा नियम आहे. नाही झाल्यास गावकरी अस्वस्थ होतात.

तुम्ही म्हणाल दर ६ महिन्याला कसल्या निवडणुका. घ्या तर मग. गावात १ ग्राम पंचायत, १ पतसंस्था, १ दूध डेअरी, १ विकास सेवा संस्था (हे काय?, फक्त प. महा. वाल्यांना माहिती असेल), १ देवस्थान प्रतिष्ठाण (नाव बघा!). ग्राम पंचायत सोडून बाकी सगळी  (गंडलेल्या) सहकाराची कृपा. या झाल्या ५ गावातल्या निवडणुका. आता स्थानिक स्वराज्य संस्था. १ पंचायत समिती. १ जिल्हापरिषद. आठवा नागरिक शास्त्र (civics इंग्लिश मधले). या दोन्ही निवडणुका सोबतच होतात. एकूण आतापर्यंत झाल्या ६. मग आल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका. बेरीज ८. अजून आहेत. १ तालुका खरेदी विक्री संघ. १ गोकुळ दूध संघ. कमीत कमी १ साखर कारखाना. एकूण ११. आता आपण असं मानू कि निवडणुका दर ५ वर्षांनी होतात. म्हणजे सरासरी २.२ निवडणुका वर्षाला. म्हणजे ६ महिन्यातून एकदा. तुमचा विश्वास बसणार नाही पण या सगळ्या निवडणुका एकदम तशाच होतात. थोडं फार मागे पुढे.

आता निवडणुकांच्या काळात नेमकं होतं काय ते सांगतो.

काळ: निवडणुकीच्या आधी एक महिना. 
परिस्थिती: वातावरण निर्मिती.  गावातील २-४ घरं/कुटुंबं बर्यापैकी पावरफुल आहेत. त्याचं नेहमीच एकमेकांशी बिनसलेलं असतं. एकदम जुन्या मराठी पिक्चर सारखं विरोधाला विरोध फोर्मुल्यानुसार गावात २ तट पडतात.म्हणजे समजा "अ पाटील" जर कॉंग्रेस वाला असेल, तर "ब पाटील" राष्ट्रवादीवाला होणार. (आमच्या गावात कॉंग्रेसचा विरोधक राष्ट्रवादीचा असतो. शिवसेनेचा नाही. गावात बाकीचे फुटकळ पक्ष आहेत. उदा. रिपाई, बसपा, शेकाप, ई.  पण एखादं घर सोडलं तर त्यांना बाकी कोणी भीक घालत नाही.) एकदा गट-तट पडण्याचं काम पूर्ण झालं कि मग बाकीचे उद्योग.

काळ: निवडणुकीच्या आधी १५ दिवस
परिस्थिती: गावातील इतर स्वघोषित  नेतेमंडळी आपापल्या सोयीनुसार गट धरतात. या काळात जर गावातून एक चक्कर टाकलीत तर अशी नेते मंडळी  लगेच ओळखून येतील. एखाद्या कोपऱ्यावर ५-६ लोकांचा घोळका करणं,  हाताची घडी घालून उभं राहून येणाऱ्या जाणार्यांकडे  शंकेखोर नजरेने बघणं, ही त्यांची लक्षणं. यांचा घोळका जमला कि गप्पा सुरु. अशा घोळक्यातल्या गप्पा एकदम मजेशीर असतात. एकदम ग्लोबल लेवलच्या. निवडणूक ग्रामपंचायतीची का असेना. विलासराव देशमुखने कसं भाषण दिले होतं, बाळ ठाकरेने शरद पवारची कशी उडवली होती, ई. अधून-मधून  लोकल आमदारांचा/विरोधकांचा उद्धार. हे लोक सगळ्यांना एकेरी संबोधतात.जणू काय सगळी नेते मंडळी प्रत्येकाच्या गोठ्यात शेण काढायला येतात.
याच काळात डिजिटल पोष्टर्स तयार होऊन रस्त्यांवर आक्रमण करतात. प्रत्येक पोष्टरवर मेन नेत्याच्या फोटो. त्याच्या खाली हे वाक्य: "आम्ही तुमच्याच सोबत" या वाक्याच्या बाजूला गल्लीतील म्होरक्याचा फोटो. आणि मग खाली २-३ लाईनीत झाडून सगळ्या "युवा" कार्यकर्त्यांचे फोटो. कॉंग्रेसच्या पोष्टर समोर राष्ट्रवादीचे पोष्टर. Content तेच. 

काळ: निवडणुकीच्या २-३ दिवस आधी.
परिस्थिती: वातावरण तंग. आचार संहितेमुळे सगळी पोष्टर्स झाकली जातात. कोपर्यावरील घोळक्याचा आकार वाढलेला असतो. शेंबडी पोरसुद्धा बाजूला उभी राहून चर्चा ऐकत असतात. आता मात्र चर्चा ग्लोबल नसतात. आता चर्चा असते ती कुणी कुणाला किती दारू पाजली, रात्रीचं जेवण कुठल्या हॉटेलात, पास कुणाकड मिळणार,  कोण कुणाची कुठली मतं फिरवणार, कुणी कुणी शपथा घेतल्या (शपथाना मानणारे लोक अजूनपण आहेत), इ. पोरांना चिंता असते ती मटणाच्या जेवणाची.

काळ: निवडणुकीची आदली रात्र
परिस्थिती: गावात २-३ पोलीस हजर. बायका हळदी कुंकवाच्या नावाखाली घरोघरी जाऊन प्रचार करतात. प्रचारातील त्यांचा पहिला आणि शेवटचा सहभाग. थोडीफार पैश्यांची देवाणघेवाण. रात्री उशिरापर्यंत घोळके आणि त्यातल्या गप्पा चालू राहतात. काही पोरं "खबर" आणायला विरोधी पार्टीच्या घोळक्याच्या जवळपास चकरा मारतात. उगाचच. विरोधी पार्टीचा कोणी बाजूने गेला कि त्याला खुन्नस मिळते. क्षणभर चर्चेचे रुपांतर कुजबुजी मध्ये होते.  परत मागे तसे पुढे चालू.


काळ: निवडणुकीचा दिवस! 
परिस्थिती: प्राथमिक शाळेत मतदान असते. केंद्रापासून १०० मीटरवर "बूथ" टाकलेले. "बूथ" वर अतिउत्साही पोरं बसलेली असतात. त्यांना उन-पाण्याची कसलीही पडलेली नसते. बूथ वर चिट्ठी मिळते. चिठ्ठीवर मतदार नंबर आणि यादी नंबर लिहून देतात. तशी त्याची काही गरज नसते. बिन चीठ्ठीचेपण मतदान होतेच की. पण उगाच शो-बाजी चालू असते बूथवर. आजकाल मतदारांना आणायला रिक्षा पाठवली जाते. रिक्षांचा आवाज गावात घुमत असतो. रिक्षातून उतरताना लोकांना एक राजेशाही आव येतोच. मतदान झाल्यावर हे लोक असा चेहरा करतात की बास आम्ही गड जिंकला तुम्ही बस वरडत! मतदानाच्या दिवशी दुपारनंतर हमखास एखादं भांडण होतं. थोडी तू-तू मै-मै होते. पोलिसांच्या थोड्याफार लाठ्या पडतात. काही लोकांची पेकाटे मस्त शेकली जातात. थोड्याच वेळात जनजीवन पूर्वपदावर. याच भांडणांचा हिशोब निकाला वेळी चुकता होतो.

काळ: निकाल
परिस्तिथी: एकीकडे गुलालाची उधळण, दुसरीकडे निराशा. गुलालाने रंगलेली पोरं आपापल्या गाड्यांचे silencers काढतात आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात गाड्या फिरवतात.  मग नेमकं विरोधी पक्षाच्या कोणाबरोबर तर अडतात. आणि मग भांडणाला सुरवात. हिशोब चुकवले जातात. परत तेच पोलीस. परत त्याच लाठ्या. आणि थोड्यावेळाने सर्वकाही  मागे तसं पुढे. काही काही गावात अशाच वादातून खूनही पडले आहेत. भैरोबाच्या कृपेने आमच्या गावात अजूनतरी असे काही झाले नाही.

वर्षातले किमान २ महिने याच घोळात खर्ची पडतात. निवडून आलेले आपला खिसा भरायच्या नादाला लागतात आणि हरलेले आपल्या समर्थकांना भडकवत बसतात. त्यामुळेच की काय आजकाल गावात वाद वाढू लागले आहेत. आधी वाद निवडणुकीसोबत संपायचे आता मात्र लोक एकमेकावर डूख धरून बसू लागले आहेत. उगाचच कटुता वाढत आहे. निवडणुका आणि राजकारण यांनी गावाला ग्रासले आहे. पण मला आशा वाटते. लोक लवकरच या मूर्खपणाला कंटाळतील आणि पोटापाण्याच्या नादाला जोमानं लागतील. आमेन!

Friday, July 16, 2010

एक फ्रस्टू पोस्ट

मी सध्या "बद्दी" नावाच्या एका गावात राहत आहे. हे गाव हिमाचल प्रदेश मध्ये आहे. लईच वाईट जागा आहे. जाम बोर होत आहे. रोज प्लांट मध्ये येणे, कामगारांवर बोंबा बोंब करणे आणि बॉसला प्रोडक्शन नंबर सांगणे यापलीकडे जिंदगीत काही सुरु नाही. असंच अजून काही दिवस चालू राहिले तर मी ठार वेडा होऊन जाईन. "निगरगट्ट" कामगारांनी लाईफची मारून ठेवली आहे.

अजून एक महाभयानक त्रास म्हणजे नेपाळी जेवण. गेस्ट हौस मध्ये नेपाळी लोक आहेत जेवण आणि बाकीची कामे करायला. एक तर हे साले १५-१५ दिवस अंघोळ करत नाहीत. तेच बनियन घालून फिरत असतात. रोज साले मिक्स वेज आणि काळी डाळ बनवतात. वैताग आला आहे. एका महिन्यात एवढे पराठे खाल्ले आहेत, आता आयुष्यात परत कधी खाणार नाही. सकाळ-सकाळी तेलाने भरलेले पराठे आणि थंडगार दही. बास. याच्या पेक्षा खतरनाक नाश्ता मी कधी केला नाही आणि कधी करणार नाही. डोक्याला शॉट आहे सगळा.

दिवसभर नेटवर टाईम पास करून वेळ घालवण्याचा प्रयत्न चालू असतो. फेस बुक, जी मेल , ई. चा मोठा आधार आहे. ९ तास झोपतो. ११ ते ८. ११ तास प्लांट मध्ये असतो. ९.३० ते ८.३०. काय झंड लाईफ चालू आहे. वरून पोटाचे प्रोब्लेम्स. बास आता. लई झाले.

Tuesday, July 13, 2010

पहिला सण

"भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील ७०% जनता शेतीवर उदरनिर्वाह करते." ऐकून/वाचून चोथा झालेले हे वाक्य. जरा खोलात जाऊन पहिले तर या fact चा आमच्या गावातल्या सणासुदीवर प्रचंड प्रभाव आहे. त्याच्यामुळेच कदाचित बेंदूर हा गावाचा पहिला सण. तुमच्या भागात याला पोळा सुधा म्हणत असतील. पण आमच्या गावात पोळा हा शब्द फक्त शाळेत पोरांना "महाराष्ट्रतील सण" हा धडा शिकवताना कानावर पडतो. नंतर कधीच नाही.

तसा गुढी पाडवा पण मस्त साजरा होतो पण बेंदूर जरा जास्त खास असतो. बेंदूर २ असतात. कर्नाटकी बेंदूर आणि महाराष्ट्री बेंदूर. कर्नाटकी बेंदूर हा आधी येतो मग महाराष्ट्री बेंदूर. कर्नाटकी बेन्दराला "कर्नाटकी" का म्हटले जाते व महाराष्ट्री बेन्दराला " महाराष्ट्री" का म्हटले जाते ते माहित नाही. माहित करून घ्यायचा प्रयत्न केला पण अजून समजलं नाही. गावात कर्नाटकाचा द्वेष केला जातो पण बेंदूर मात्र कर्नाटकी साजरा केला जातो. कारण माहित नाही. कदाचित कर्नाटकाची जवळीक याचे कारण असेल. (नसेल पण. उगाच तुक्का मारला.)

कर्नाटकी बेंदूर हा ज्येष्ठ द्वितीयेला येतो आणि दणक्यात साजरा केला जातो. ३ गोष्टी नेमाने केल्या जातात.

. जनावरांची सेवा:
गोठ्यातील सर्व जनावरांना गरम पाण्याने अंघोळ घालून त्यांची शिंगे ऑइल रंगाने रंगवणे. नंतर त्यांची पूजा करून त्यांना पुरणाची पोळी व बाजरीचा खिचडा चारणे (खिचडी नाही खिचडा. बाजरी भरडून त्यात गूळ मिसळला जातो. त्याला खिचडा म्हणतात), इत्यादी कामे सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान संपवली जातात.
८०% वेळ बैलांची सेवा. उरलेला २०% म्हशींसाठी. बैलांना अंघोळ घालून सजवण्यात वेगळीच मजा असते. शिंगे रंगवलेले बैल काय रुबाबदार दिसतात. त्यांना दृष्ट लागू नये म्हणून घरच्या बायका त्यांना काजळ लावतात. म्हशींचे तसे नाही. कितीही धुतले तरी returns फार कमी.
पूर्वी प्रत्येक घरात एक बैल जोडी असायची आणि काही म्हशी असायच्या. आता बैल जोड्या जवळपास नाहीतच. चुकून एखाद्याकडे. त्यामुळे बैलांचा तो रुबाब आता पाहायला मिळत नाही. बैल जोड्या सुधा आता खूप महाग झाल्या आहेत. किमान ७० हजाराच्या खाली मिळत नाहीत. अजून ७० हजार घातले तर जुना ट्राक्टर येतो.

. बेंदूर तळणे:
मी: "आई, बेंदूर काय तळलाय?"
आई: "कांद्याची भजी आणि धपाटे"
मी: "भज्या संगं धपाटे?"
आई: "भजी नुसती खा आणि धपाट्या संगं दही"
तात्पर्य: नेर्ली गावात बेंदूर तळला जातो.

गावात बेंदराच्या दिवशी प्रत्येकाची घरी तळलेले पदार्थ करतात. त्यालाच बेंदूर तळणे म्हणतात. बेंदराच्या वेळी बऱ्यापैकी पेरण्या आटपलेल्या असतात. पिकं नुकतीच वर येऊ लागलेली असतात. थोडासा विश्रांतीचा वेळ असतो. तो celebrate करण्यासाठी काहीतरी चमचमीत करून खाणे हा बेंदूर तळण्यामागचा हेतू. मग कोणी भजी तळतात तर कोणी शाबुचे सांडगे. धपाटे मात्र सगळेजण करतात. दही-धपाटे म्हणजे जोरात जेवण. बेंदूर तळण्याचा आणि खाण्याचा कार्यक्रम दुपारपर्यंत चालतो. नंतर मग आपो आप डुलकी लागते.

३. करीचा बैल:
करीचा बैल हा एक धमाल प्रोग्राम असतो. गावातले सगळे लोक भरभरून सहभागी होतात.
"कर" ही एक दोरी असते, जी गावाच्या वेशीवर बांधलेली असते. आमच्या वेशीवर एका बाजूला पिंपळाचे झाड आहे. दुसऱ्या बाजूला खांब रोवून, झाडापासून खांबापर्यंत दोरी बांधली जाते. या दोरीला सुबाभूळीच्या फांद्या अडकवलेल्या असतात. दोरीच्या मध्यभागी पुरणाची पोळी आणि नारळ बांधलेला असतो. या दोरीच्या खाली सुबाभूळीच्याच फांद्यांचा ढीग टाकलेला असतो. पळत येऊन उडी टाकल्याशिवाय हा ढीग पार करता येत नाही एवढी उंची असते. हे झालं करी बद्दल.

आता बैला बद्दल थोडे. हा बैल chosen one असतो. गावातील "गावधणी" पाटलाचा हा बैल. "गावधणी" हि पाटलांसाठी सर्वोच्च पदवी. हां तर या बैलाला पाटलांच्या वाड्यात भरपूर सजवले जाते. शिंगाना फुगे, अंगावर झालर, शेपटीचे केस नीट कापून व्यवस्थित आकार दिला जातो. एकूण काय या बैलाची चैनी असते. चैनीचा कहर म्हणून बैलाला दारू पाजली जाते. दारू पिल्यानंतर बैलाला मस्त झिंग चढते. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत "कर" बांधणे आणि "करीचा बैल" सजवणे उरकून घेतले जाते.

आता आली मिरवणुकीची वेळ.
बैलाला दारू पाजत असतानाच मंडळांची पोरं हालगी तापवायला सुरवात करतात. थोड्याच वेळात हालगी कडाडू लागते. सोबतीला १०-१५ लेझमी . झिंग चढलेला हा बैल मग मिरवणुकीसाठी बाहेर काढला जातो. मिरवणूक सुरु. हलगी आणि लेझमींचा खेळ रंगू लागतो. ठरलेल्या रस्त्याने मिरवणूक जोशात पुढे सरकत राहते. बैलाला आवरण्यासाठी ४ मुसक्या बांधल्या जातात. काही हट्टीकट्टी पोरं या मुसक्या धरून असतात. बैलाच्या पुढे वात्रट पोरं हूल देण्याचा प्रयत्न करत असतात. काठीला लाल कापड लावून बैलापुढे मिरवतात. बैल भुजतो. सैरभैर होतो. कोणाच्याही अंगावर धावून जातो. मुसक्या धरलेल्या पोरांना काम लागते. बैलाला आवरता आवरता त्यांना घाम फुटतो. बघ्यांचे मनोरंजन होते.

या मिरवणुकीचे काही ठरलेले stops आहेत. पाटलांचा वाडा, संकपाळ गल्ली, सडोल्यांचे घर आणि मग गाव चावडी. प्रत्येक ठिकाणी बैलाच्या पायावर पाणी घातले जाते. सुवासनी बैलाला ओवाळतात. लेझमीचा एक डाव होतो. आणि मग परत मिरवणूक चालू. भैरोबाच्या देवळाला येढा घालून मिरवणूक वेशीच्या बाहेर पोहोचते. करीपासून किमान २०० मीटर अंतर दूर.

यावेळी बैला सोबत फक्त ४ जण राहतात. बाकीचे करी जवळ येतात. थांबलेल्या ठिकाणापासून बैलाला पळवत आणले जाते. एकदम वेगाने बैल आणि सोबतची पोरं करीकडे पळत येतात. त्यावेगात बैल आणि त्याच्या सोबतची पोरं त्या बाभळीच्या ढिगावरून उडी टाकतात. पोरांचा म्होरक्या करीला बांधलेली पोळी तोडून सोबत घेऊन जातो. आणि काही सेकंदात तो ढीग रिकामा होतो. बाजूला उभे असलेले गावकरी मिळेल तितक्या फांद्या उचलतात आणि घराच्या वाटेला लागतात. बैलाने ओलांडलेल्या या फांद्या खूप पवित्र मानल्या जातात. ह्या फांद्या मग घरावर टाकल्या जातात. श्रद्धा अशी आहे कि ज्याच्या घरावर फांदी असते, त्याची शेतं त्या फांदी प्रमाणे हिरवीगार राहतील.

तो झिंग चढलेला बैल आणि ती झिंग चढलेली पोरं. त्या फांद्यांना अचानक आलेली किंमत. बैलाची उडी. म्होरक्याचे ते पोळी तोडणे. आणि लोकांचे ते फांद्या लुटणे. एक अविस्मरणीय अनुभव. खासकरून लहान पोरांसाठी. माझे घर अगदी वेशी जवळ असल्यामुळे आज पर्यंत अनेकदा हा सोहळा मी एकदम जवळून अनुभवला आहे. पण जितक्या वेळा अनुभवेन तितका कमीच वाटतो.

Wednesday, July 7, 2010

चांग भलं!

भैरोबाच्या नावाने चंग भलं! जोतिबाच्या नावाने चंग भलं! उदे ग अंबे उदे!
मी प्रवीण पाटील रा. नेर्ली ता. करवीर जि. कोल्हापूर. आमच्या ३ ग्राम देवतांना अभिवादन करून ब्लॉग ची सुरवात करतो. कोल्हापूर आणि आस पासच्या परिसरात "आधी वंदू तुज मोरया" ची जागा "उदे अंबे उदे!" दिली गेली आहे.
प्रत्येक गावाला स्वताचा इतिहास भूगोल असतो. आमच्या गावाला सुद्धा आहे. गाव सोडून आज १० वर्षे झाली. त्या निमित्ताने त्या इतिहासाची, भूगोलाची आठवण येत आहे. म्हणून हा ब्लॉग लिहायचा प्रपंच.
या पहिल्या पोस्त मध्ये माझ्या गावाविषयी थोडीशी कल्पना द्यावी हा विचार.
सात-आठ हजार लोकवस्तीचे आमचे गाव. गावात प्रामुख्याने पाटलांची वस्ती. अंदाजे ३०%. त्यातला मी एक पाटील. तसे गावात १२ बलुतेदारी मध्ये समावेश असणारया सर्व जातीचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत. अलीकडच्या काळात गावात यु पी/बिहारी लोकांची वस्ती वाढत आहे. कारण आहे गावाला वेढलेल्या ३ MIDCs. असो. त्या विषयाला हात घालण्याचे प्रयोजन नाही. राज ठाकरे साहेबांचे ते राखीव कुरण आहे. तिकडे आमच्यासारख्याने चरून चालणार नाही. असो.
उदार निरावाहासाठी शेती हा मुख्य आधार. उसाचे पीक प्रामुख्याने. ९०% लोक लहान शेतकरी. जास्तीत जास्त ३-४ एकर जमीन असणारे. शेती शिवाय गावाला MIDC च्या रूपाने चांगला income सौर्चे लाभला आहे. गावची बरीचशी तरुण पोरं दहावी/ बारावी पास/नापास झाल्यानंतर जेवणाचा दाबा घेऊन MIDC गाठतात. आमच्यासारखी काही पुढे शिकण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी झाले तर गाव सोडतात, नाहीतर शेती किंवा MIDC.
गावात राजकारण जोरात चालते. सहकारी संस्थांचे पीक जोमाने डोलते आहे. प्रत्येक निवडणूक तितक्याच जोशात लढवली जाते. कधी कधी असे वाटते जर निवडणुका नसत्या तर या गावाचे मनोरंजन कसे झाले असते? तरुण पोरं कामावरून परत आल्यावर आपला वेळ "तरुण मंडळ" नावाच्या गोष्टीत व्यतीत करतात. गावात नाही म्हटले तरी २५-३० तरुण मंडळे असावीत.
गावात एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. सध्या खूप चांगली इमारत झाली आहे तिची. मी लहान असताना हनुमानाच्या देवळात वर्ग भरायचे. एक हाय स्कूल सुद्धा आहे. सांगण्यास आनंद होतो कि ते माझ्या वडिलांनी सुरु केले आहे. माझे वडील पोष्टात काम करत होते. कुटुंबाबद्दल आता पुरते इतकेच.
भैरोबा हा आमचा देव. अंबाबाई आमची देवी. भैरोबाचे मोठे देऊळ आहे गावात. आमदार फंडमधून निधी घेऊन एक मोठा हॉल बांधला आहे. आता गावातील लग्न या हॉल मध्ये होतात. आधी ज्याच्या त्याच्या दारात व्हायची. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आरोग्य केंद्र सुरु झाले आहे काही दिवसांपूर्वी. जिथे मोफत धनुर्वाताचे इंजेक्शन मिळते.
गावात रोगराई कमीच. आज काल डांबरी रस्ते झाले आहेत गावात सुधा. गटारींची, नळाच्या पाण्याची चांगली सोय आहे. लाईट खूप कमी वेळ जाते. फक्त सोमवारी. कारण त्या दिवशी MIDC बंद असते. कोल्हापुरातून केबल टी व्ही चे कनेक्शन आले आहे. आधी TV वर फक्त चित्रहार चालायचा. आता 9XM चालतो.
तर एकूण काय, आमचे गाव तसे काहीसे समृद्ध आणि संतुष्ट आहे. जास्त प्रोब्लेम्स नाहीत. विदर्भ वाल्या गावांसारखे. आत्महत्या तर मुळीच नाहीत. हे सांगण्यात विदर्भाला कमी दाखवायचा हेतू नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच आमच्या गावाचे बरे चालले आहे. किमान सकृतदर्शनी!
हा आमच्या गावाचा परिचय. पुढील काही पोस्त मध्ये, आमच्या गावातील काही व्यक्ती, रिती रिवाज, सण-परंपरा याविषयी उहापोह करण्याचा विचार आहे. पाहू कितपत जमते ते.
परत एकदा ... भैरोबाच्या नावाने चंग भलं! जोतिबाच्या नावाने चंग भलं! उदे अंबे उदे!
आणि एवढे लिहून आपली रजा घेतो.
आपला विनम्र,
प्रवीण.