Wednesday, July 21, 2010

राजकारण-१

या पोस्टला राजकारण-१ हे नाव दिले आहे. कारण असं कि आमच्या गावातल्या राजकारणावर एखादं १०० पानांचं पुस्तक आरामात लिहिता येईल. काळजी करायचं कारण नाही, मी लिहिणार नाही. १-२ पोस्ट मध्ये काम तमाम. चला सुरुवात करतो.

आमच्या गावात आम्ही राजकारण खातो, पितो, उठतो, बसतो आणि अजून जे काही करता येणं शक्य आहे, ते सगळं करतो. अतीच झालं असं वाटल तुम्हाला पण ते अती नाहीय. राजकारणानं गावाची वाट लावलीय आणि गावाने सुद्धा राजकारणाची तितकीच वाट लावली आहे. दर ६ महिन्याला निवडणुका झाल्याच पाहिजेत असा नियम आहे. नाही झाल्यास गावकरी अस्वस्थ होतात.

तुम्ही म्हणाल दर ६ महिन्याला कसल्या निवडणुका. घ्या तर मग. गावात १ ग्राम पंचायत, १ पतसंस्था, १ दूध डेअरी, १ विकास सेवा संस्था (हे काय?, फक्त प. महा. वाल्यांना माहिती असेल), १ देवस्थान प्रतिष्ठाण (नाव बघा!). ग्राम पंचायत सोडून बाकी सगळी  (गंडलेल्या) सहकाराची कृपा. या झाल्या ५ गावातल्या निवडणुका. आता स्थानिक स्वराज्य संस्था. १ पंचायत समिती. १ जिल्हापरिषद. आठवा नागरिक शास्त्र (civics इंग्लिश मधले). या दोन्ही निवडणुका सोबतच होतात. एकूण आतापर्यंत झाल्या ६. मग आल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका. बेरीज ८. अजून आहेत. १ तालुका खरेदी विक्री संघ. १ गोकुळ दूध संघ. कमीत कमी १ साखर कारखाना. एकूण ११. आता आपण असं मानू कि निवडणुका दर ५ वर्षांनी होतात. म्हणजे सरासरी २.२ निवडणुका वर्षाला. म्हणजे ६ महिन्यातून एकदा. तुमचा विश्वास बसणार नाही पण या सगळ्या निवडणुका एकदम तशाच होतात. थोडं फार मागे पुढे.

आता निवडणुकांच्या काळात नेमकं होतं काय ते सांगतो.

काळ: निवडणुकीच्या आधी एक महिना. 
परिस्थिती: वातावरण निर्मिती.  गावातील २-४ घरं/कुटुंबं बर्यापैकी पावरफुल आहेत. त्याचं नेहमीच एकमेकांशी बिनसलेलं असतं. एकदम जुन्या मराठी पिक्चर सारखं विरोधाला विरोध फोर्मुल्यानुसार गावात २ तट पडतात.म्हणजे समजा "अ पाटील" जर कॉंग्रेस वाला असेल, तर "ब पाटील" राष्ट्रवादीवाला होणार. (आमच्या गावात कॉंग्रेसचा विरोधक राष्ट्रवादीचा असतो. शिवसेनेचा नाही. गावात बाकीचे फुटकळ पक्ष आहेत. उदा. रिपाई, बसपा, शेकाप, ई.  पण एखादं घर सोडलं तर त्यांना बाकी कोणी भीक घालत नाही.) एकदा गट-तट पडण्याचं काम पूर्ण झालं कि मग बाकीचे उद्योग.

काळ: निवडणुकीच्या आधी १५ दिवस
परिस्थिती: गावातील इतर स्वघोषित  नेतेमंडळी आपापल्या सोयीनुसार गट धरतात. या काळात जर गावातून एक चक्कर टाकलीत तर अशी नेते मंडळी  लगेच ओळखून येतील. एखाद्या कोपऱ्यावर ५-६ लोकांचा घोळका करणं,  हाताची घडी घालून उभं राहून येणाऱ्या जाणार्यांकडे  शंकेखोर नजरेने बघणं, ही त्यांची लक्षणं. यांचा घोळका जमला कि गप्पा सुरु. अशा घोळक्यातल्या गप्पा एकदम मजेशीर असतात. एकदम ग्लोबल लेवलच्या. निवडणूक ग्रामपंचायतीची का असेना. विलासराव देशमुखने कसं भाषण दिले होतं, बाळ ठाकरेने शरद पवारची कशी उडवली होती, ई. अधून-मधून  लोकल आमदारांचा/विरोधकांचा उद्धार. हे लोक सगळ्यांना एकेरी संबोधतात.जणू काय सगळी नेते मंडळी प्रत्येकाच्या गोठ्यात शेण काढायला येतात.
याच काळात डिजिटल पोष्टर्स तयार होऊन रस्त्यांवर आक्रमण करतात. प्रत्येक पोष्टरवर मेन नेत्याच्या फोटो. त्याच्या खाली हे वाक्य: "आम्ही तुमच्याच सोबत" या वाक्याच्या बाजूला गल्लीतील म्होरक्याचा फोटो. आणि मग खाली २-३ लाईनीत झाडून सगळ्या "युवा" कार्यकर्त्यांचे फोटो. कॉंग्रेसच्या पोष्टर समोर राष्ट्रवादीचे पोष्टर. Content तेच. 

काळ: निवडणुकीच्या २-३ दिवस आधी.
परिस्थिती: वातावरण तंग. आचार संहितेमुळे सगळी पोष्टर्स झाकली जातात. कोपर्यावरील घोळक्याचा आकार वाढलेला असतो. शेंबडी पोरसुद्धा बाजूला उभी राहून चर्चा ऐकत असतात. आता मात्र चर्चा ग्लोबल नसतात. आता चर्चा असते ती कुणी कुणाला किती दारू पाजली, रात्रीचं जेवण कुठल्या हॉटेलात, पास कुणाकड मिळणार,  कोण कुणाची कुठली मतं फिरवणार, कुणी कुणी शपथा घेतल्या (शपथाना मानणारे लोक अजूनपण आहेत), इ. पोरांना चिंता असते ती मटणाच्या जेवणाची.

काळ: निवडणुकीची आदली रात्र
परिस्थिती: गावात २-३ पोलीस हजर. बायका हळदी कुंकवाच्या नावाखाली घरोघरी जाऊन प्रचार करतात. प्रचारातील त्यांचा पहिला आणि शेवटचा सहभाग. थोडीफार पैश्यांची देवाणघेवाण. रात्री उशिरापर्यंत घोळके आणि त्यातल्या गप्पा चालू राहतात. काही पोरं "खबर" आणायला विरोधी पार्टीच्या घोळक्याच्या जवळपास चकरा मारतात. उगाचच. विरोधी पार्टीचा कोणी बाजूने गेला कि त्याला खुन्नस मिळते. क्षणभर चर्चेचे रुपांतर कुजबुजी मध्ये होते.  परत मागे तसे पुढे चालू.


काळ: निवडणुकीचा दिवस! 
परिस्थिती: प्राथमिक शाळेत मतदान असते. केंद्रापासून १०० मीटरवर "बूथ" टाकलेले. "बूथ" वर अतिउत्साही पोरं बसलेली असतात. त्यांना उन-पाण्याची कसलीही पडलेली नसते. बूथ वर चिट्ठी मिळते. चिठ्ठीवर मतदार नंबर आणि यादी नंबर लिहून देतात. तशी त्याची काही गरज नसते. बिन चीठ्ठीचेपण मतदान होतेच की. पण उगाच शो-बाजी चालू असते बूथवर. आजकाल मतदारांना आणायला रिक्षा पाठवली जाते. रिक्षांचा आवाज गावात घुमत असतो. रिक्षातून उतरताना लोकांना एक राजेशाही आव येतोच. मतदान झाल्यावर हे लोक असा चेहरा करतात की बास आम्ही गड जिंकला तुम्ही बस वरडत! मतदानाच्या दिवशी दुपारनंतर हमखास एखादं भांडण होतं. थोडी तू-तू मै-मै होते. पोलिसांच्या थोड्याफार लाठ्या पडतात. काही लोकांची पेकाटे मस्त शेकली जातात. थोड्याच वेळात जनजीवन पूर्वपदावर. याच भांडणांचा हिशोब निकाला वेळी चुकता होतो.

काळ: निकाल
परिस्तिथी: एकीकडे गुलालाची उधळण, दुसरीकडे निराशा. गुलालाने रंगलेली पोरं आपापल्या गाड्यांचे silencers काढतात आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात गाड्या फिरवतात.  मग नेमकं विरोधी पक्षाच्या कोणाबरोबर तर अडतात. आणि मग भांडणाला सुरवात. हिशोब चुकवले जातात. परत तेच पोलीस. परत त्याच लाठ्या. आणि थोड्यावेळाने सर्वकाही  मागे तसं पुढे. काही काही गावात अशाच वादातून खूनही पडले आहेत. भैरोबाच्या कृपेने आमच्या गावात अजूनतरी असे काही झाले नाही.

वर्षातले किमान २ महिने याच घोळात खर्ची पडतात. निवडून आलेले आपला खिसा भरायच्या नादाला लागतात आणि हरलेले आपल्या समर्थकांना भडकवत बसतात. त्यामुळेच की काय आजकाल गावात वाद वाढू लागले आहेत. आधी वाद निवडणुकीसोबत संपायचे आता मात्र लोक एकमेकावर डूख धरून बसू लागले आहेत. उगाचच कटुता वाढत आहे. निवडणुका आणि राजकारण यांनी गावाला ग्रासले आहे. पण मला आशा वाटते. लोक लवकरच या मूर्खपणाला कंटाळतील आणि पोटापाण्याच्या नादाला जोमानं लागतील. आमेन!

3 comments:

  1. (वार्ताहर)
    नेर्ली गावात कानावर पडलेला संवाद पुढे देत आहोत...
    " आयला, या पाटलांच्या परवीन ला लई कंठ फुटलाय की! "
    " का रं, आज काय लिवलंय रांड्यान?"
    " आपल्या राजकार्नाला मूर्ख म्हणालाय...म्हणालंय पोटा पाण्याच धंदा बघा आधी.."
    " त्येला म्हणावं, लई शिकून बामन होन्यापेक्षा न शिकता राज्कारण करतुया आमी"
    " मला तर वाटलंय आपल्या गावचा आमदार मागच्या इलेक्शनला पडला म्हून आपल्या ठ्राजेडीची कामेडी करालय, शेक्स्प्यार ल****च"
    " येऊदे की भडव्याला गावात सांगतु मग त्याला आमी काय शिकलोय ते...बर्फाच इतळून पानीच हुतंय म्हनाव "
    " ते नव्ह मी काय म्हन्तोय, राजकार्नाचाच डाव टाकला तर त्याच्या वर..?"
    "म्हंजे रं शिर्प्या?"
    " शिक्षण संस्थेच्या बोडीवर उतरुया की त्याला आपल्या गटाकाद्दन....पैसा वडायाले लावू म्हंबई कडून..इंग्लिश बी बोलतंय ते.."
    " अरं पार त्यो कुठला तायैर हुतोय..?"
    " धा बाय बारा च्या डीजीटल बोर्डावर सवताचा फोटू बघून भल्या-भल्यांच गाल गुलाबी हुत्यात..हीहीही.."
    "आर लई भारी शिर्पा....पयलं जेवान कोलापुरात घेऊया त्याकडन...कावळा नाक्यावर लई बेस हाटेल हायेत म्हन.."
    "आये पोरानू जावा की शाळेला....तुमच्या आयला जेवान म्हन्ल्यावर आली लगेच...आनी व्हय लई शिकू नका.. न्हाईतर आमच्यावरच पावशेर.."
    "हिहीहीहेहे.."

    ReplyDelete
  2. Lai bhari !!!!

    Sadharantah pratek gavant asach chalu ahe.

    ReplyDelete
  3. @सोम्या: पांचट पत्रकारितेचा उत्कृष्ट नमुना. इंडिया टी व्ही मध्ये व्हेकन्सी आहेत. नंबर लागून जाईल. :P आपल्याला एक आवडलं - "शेक्स्प्यार ल****च", तुमच्या कोल्हापुरातील दीर्घ वास्तव्याचे प्रतिबिंब उमटले आहे त्यात.


    @प्रसन्ना : स्वागत आहे राव तुमचे. बरोबर आहे. सगळीकडे असेच चालते. आमच्या इथ जरा जास्तच चालते.

    ReplyDelete